भावलेख
Friday, June 25, 2021
हॕप्पी वटपोर्णिमासहज गंमत म्हणून एक पोस्ट फेसबुकवर टाकली - वड पुजणाऱ्या बाया मनात काय विचार करत असतील?बाई १. जन्मोजन्मी असाच साधा भोळा हवा. बाई २. पुढच्या जन्मी नवा दे आणि जरा बरा दे. बाई ३. पुढचे सहा जन्म कोणताही दे, पण हा नको. बाई ४. पुढच्या जन्मी हा माठ बिलकुल नको. बाई ५. बाईचा जन्मच नको पुढल्यावेळी. बाई ६. नवराच नको कोणत्याच जन्मी... ही यादी अजून कितीही वाढवा म्हटलं ... तशी अनेकांनी यादी वाढवत नेली. अनेकांनी उत्फुर्त आणि मिश्किल प्रतिक्रिया दिल्या... 'जो आहे त्याला पुर्नजन्म नको, दुसरीचे भोग तरी वाचतील!', 'याची देही याच डोळा पितृसत्ताक रीती आणि रूढी नष्ट होऊ दे', 'सात जन्मांचं टेन्शन नको याच जन्मात सात दे', 'लग्न संस्थाच नष्ट होऊदे', 'वड पुजणेच बंद होऊ दे', 'जरा ह्या जन्मात सात जमतात का बघा ना', 'पुढच्या जन्मी या नवऱ्याची बायको न होता नवरा होवू दे जरा उट्ट काढायची संधी मिळू दे', 'पुरूष वड कधी पुजणार?' अशी बरीच गंभीर आणि गमतीदार मतं आली. 'अगं बाई अरेच्च्या' या चित्रपटात वडपूजेचा प्रसंग फार गमतीदार रंगवला आहे. नटूनथटून नऊवारी नेसून साग्रसंगीत पूजा करणाऱ्या आणि वडाला फेऱ्या मारणाऱ्या बायका मनातल्या मनात काय विचार करतायत हे या चित्रपटाच्या नायकाला ऐकू येतं. "याच जन्मात जगणं नकोसं केलंय तर "पुढच्या जन्मी कशाला मागू याला?", "जरा म्हटलं आज माझ्यासोबत उपवास करा तर नाही ते पण जमत नाही यांना", "चांगलं त्या डॉक्टरचं स्थळ चालून आलं होतं, त्यालाच हो म्हणायला हवं होतं." अशा अर्थाची किती अन् काय काय स्वगते बायकांच्या मनात चाललेली असतात. संपूर्ण चित्रपटातच बायकांच्या मनातले विचार त्याला ऐकू येत राहातात. तो त्रस्त होतो. बायकांच्या बडबडीचा त्याला राग येतो, त्रास होतो. पण हे ऐकू येणं मात्र तो थांबवू शकत नाही. एक स्त्री मानसोपचार तज्ज्ञ त्याचे समुपदेशन करतात आणि स्त्रियांच्या मनात चाललेली घुसमट, तगमग, त्रागा, मनस्ताप याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी त्याला प्रदान करतात आणि हा नायक आपल्या आई, बहिण, आजी, बायको आणि इतर बायकांच्या मनातला कोंडमारा ओळखून त्यांच्या मनासारखं वागू पाहतो. अतिशय गमतीशीर आणि मार्मिक पध्दतीने स्त्रियांच्या जगण्याचा, तगमगीचा वेध घेणारा हा सिनेमा आहे. पण त्यांना समजून घेणारे नायक प्रत्यक्ष जीवनात फारच कमी आहेत. उलट स्त्रियांवर सत्ता प्रस्थापित करू पाहणारे, तिला पारंपारिक चौकटीतून बाहेर पडू न देणारे पुरुष आजही घरोघरी आहेत. ‘परिकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का?' 'कही तो मिल जायेगा, मेरा बलमा', ' किसी दिन बनूंगी, मै राजा की रानी' अशी स्वप्न पहात मोठ्या होणाऱ्या मुली - शिक्षण, करियर, नोकरी यांपेक्षा 'लग्न' या गोष्टीला महत्त्व देऊन वाजत-गाजत नवऱ्याच्या घरी नांदायला जातात. आणि मग वर्षानुवर्षे अशी पातिव्रत्य, पुनर्जन्म, पावित्र्य, मांगल्य यात सार्थकता मानणारी व्रतवैकल्यं करत राहतात. कधी नटण्या-मुरडण्याची हौस म्हणून, तर हल्ली एक इव्हेन्ट म्हणूनदेखील अशा सणवार-व्रतांकडे पाहिलं जातं. पूर्वी म्हणजे साधारण ऐंशी ते नव्वदच्या दशकात 'दिल्या घरी तू सुखी रहा' टाईपच्या मुलींची संख्या खूप होती. 'डोली चढके मे आई, कांधे पे जाऊंगी', असे म्हणत गप्प राहून सहनशीलतेचा कळस गाठणाऱ्या पोरी दर वटपौर्णिमेला नटून-थटून वडाभोवती दोरा गुंडाळायला जायच्या. मग दारू पिऊन किंवा दारू न पिता मारणारा, घराबाहेर काढणारा नवरा असो की गप्प राहून खेळी करणारा आई-वडिलांचा 'श्रावणबाळ' असो - 'मेरा पति मेरा देवता है' म्हणत बायका पुढचे सात जन्म त्यालाच मागण्यासाठी वडाभोवती फेर्या मारायच्या. मग त्या पुरुषाने दोन-दोन लग्नं केली तरी 'मै तुलसी तेरे आंगन की' म्हणत दोघीही त्याच्या दीर्घायुष्याची आणि पुढच्या जन्मी पुन्हा हाच नवरा मिळावा, यासाठी दुवा मागत राहायच्या. म्हणजे पुढच्या जन्मी परत हीच कहाणी कन्टीन्यू... हिंदी सिनेमातलं 'करवा चौथ' असो वा मराठी सिनेमातलं 'वटपौर्णिमा' व्रत. एकीकडे आधुनिकीकरणामुळे मध्यमवर्गीय समाजात बोकाळलेला चंगळवाद आणि त्यांचे होणारे ग्राहकीकरण; तर दुसरीकडे व्रते व ते साजरे करण्याची पध्दत अशी विरोधाभासी परिस्थिती दिसत आहे. बॉलीवूडमधल्या दिग्दर्शकांनी 'डीडीएलजे', 'कभी खुशी कभी गम', 'हम दिल दे चुके सनम' अशा अनेक चित्रपटांमधून करवा चौथ प्रचंड लोकप्रिय केला. चित्रीकरणातील भव्यता, गाणी, पोषाख दागदागिने यांची सामान्य दर्शकांवर भुरळ पडत गेली. मग ड्रेसेस, साड्या, ज्वेलरी मार्केटिंगने बाजी मारली. मुंबईसारख्या महानगरापासून ते छोट्या शहरापर्यत मेहेंदि सर्विसेस, पूजा थाळी, मिठाई आणि फुले, ज्वेलर्सकडून तसेच टेलर आणि ब्युटी पार्लरकडून वेगवेगळी सूट मिळू लागली. बॉलिवूड तारका, सेलिब्रेटींनीही या कंपन्यांच्या वस्तू परिधान करुन इन्स्टाग्राम ट्विटरसारख्या सोशल मिडियावर विधीवत पूजेचे सेल्फी शेअर करत 'हॅप्पी करवा चौथ' केले. अशा कंपन्यांनी स्पॉनसर केलेल्या पार्ट्या, विविध स्पर्धा यांना उत्सवी रुप आले. हल्ली तर अमरावतीसारख्या छोट्या शहरातही अशा इव्हेंटला मिसेस अमरावती, बेस्ट मॉम, बेस्ट वाईफसारख्या सौंदर्य स्पर्धा होऊ लागल्यात आणि वारेमाप पैसा खर्च करत, घराघरातून संघर्ष करत साध्या भोळ्या 'सुहागनस्' त्यात नशीब आजमावू लागल्यायत. जागतिकीकरणाच्या काळात स्त्रीत्वाचा हा नवा अवतारच जणू. अशा झगमगटात अडकून मग सामान्य बायकाही 'सदा सुहागन' बनून मूर्खपणाचे ढोल वाजवत राहिल्या. आणि आपल्या येणार्या पिढीतही ही परंपरा रुजवत राहिल्या. बरं या बाया-आया सगळ्याच अशिक्षित होत्या असं नाही, शाळेत गणित, विज्ञान शिकविणाऱ्या शिक्षिका, डॉक्टर, इंजिनिअर असलेल्या बायासुद्धा आपल्या विवेकाचं गाठोडं दूर बांधून ठेवून, 'मै तुम्हरी दासी, जनम की प्यासी, तुम्ही हो मेरा सिंगार साजन!' असे म्हणत नटूनथटून वडपूजेला जाऊ लागल्या. वीस पंचवीस वर्षापूर्वी वडाचे चित्र काढून किंवा मुलांकडून काढून घेऊन व्रत पूर्ण करणाऱ्या भोळसट बाया होत्या. तर, शहरी भागात वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून किंवा विकत आणून पर्यावरण वगैरे कल्पना धादांत खोट्या ठरवत पूजा करणाऱ्या माता-भगिनी होत्या आणि अजूनही आहेत. वर्षानुवर्षे पुरुषसत्ताक विचारांनी स्त्रीचे स्वातंत्र्य बांधून टाकून तिला वेगवेगळ्या धार्मिक, उदात्त, पवित्र संकल्पनांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. तिची सृजनशक्ती फसव्या प्रतिमेत अडकवून तिला कायम अबला बनवण्याचा प्रयत्न केला गेला. स्त्रीने परंपरेला सोडू नये आणि आधुनिकतेला अंगिकारू नये, यासाठी ही पुरूषसत्तेची आत्यंतिक धडपड होती आणि त्यात ते यशस्वीही झाले. सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले यांनी खुल्या केलेल्या स्त्री शिक्षणाच्या वाटेवरून चालताना मात्र प्रत्यक्ष स्त्रीने आपल्या विवेकाचा वापर न करता स्वतःची बुद्धी गहाण टाकून अशा गुलामीतच राहणे पसंत केले. व्रतवैकल्ये केल्याने कोणी दीर्घायुषी होईल का? पुढच्या जन्मात हवी ती व्यक्ती अशी मागून मिळते का? मुळात पुनर्जन्म वगैरे कल्पनांवर आजची सुशिक्षित मुलगी विश्वास ठेवते हेच हास्यास्पद आहे. वड ऑक्सिजन देतो म्हणून किंवा रोजच्या कामातून बाहेर पडण्याची संधी म्हणून शिकल्यासवरल्या, नोकरी करणाऱ्या मुलीसुद्धा वाहिन्यांवरच्या नेभळट नायिके सारख्या नटूनथटून, भरपूर मेकअप करुन सोशल मीडियावर “हॅप्पी वटपोर्णिमा” म्हणत लाईक आणि कमेंटची वाट बघत दिसतील तेव्हा फार आश्चर्य वाटून घ्यायला नको ! सारिका उबाळे
Thursday, January 3, 2019
स्वतंत्र भारत धुळे
आभार मा. संपादक ..
व्हाँट इज युवर भाषा ?
समोर बसलेल्या आठ नऊ वर्षाच्या मुलांमध्ये सौम्य भांडण.एकाचे फुगलेले गाल,रागावलेला चेहेरा ,ताणलेल्या भुवया तर दुसऱ्या चा त्रासिक चेहेरा पाहून त्यांना जवळ बोलावलं..
मुलांशी बोलतांना प्रत्येक वेळी ईंग्रजीतच बोललं पाहीजे या नियमाला जाणिवपुर्वक अव्हेरुन अभ्यासाव्यतिरिक्तचे प्रश्न मी मराठीतच विचारते.माझा विषयच मराठी असल्याने मी तसं करु शकते..
आणि विद्यार्थी ही माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतात....
तर
What happen ’ च्या ऐवजी ‘काय झालंय?’ विचारताच दोन्ही गोड गोबर्या मुलांपैकी त्रासिक चेहर्यावाला उत्तरला,
“मीस.... मै ना, चूपचाप बैठा ता तो यानं नयी क्या... मेरे डोळे मे बोट टोचा....” त्याचं बोलून पूरं व्हायच्या आतच दुसरा बोलला “नयी मिस नयी मिस... हा खोटा बोलरा है।” इसनेयीच नयी क्या, ऑ..? नयी क्या मेरे पोट मे बुक्की मार्या”
हातवारे करुन करुन आपलं म्हणणं पटवून देणार्या आणि जेमतेम येणार्या भाषेची सरमिसळ करणार्या त्या इटुकल्यांकडे पाहून हसू येत होतं तर दुसरीकडे तेवढीच काळजी वाटत होती. कारण अगदी पहिल्या दुसर्या वर्गापासून ते आठवी नववीतल्या विद्यार्थ्यांची हीच अवस्था होती.
आजकाल इंग्रजी माध्यमांच्या शाळेचं वाढतं प्रस्थ श्रीमंतांपासून ते गोरगरिबांच्या आपल्या मुलांना इंग्रजीतून शिक्षण देण्याचा अट्टहास धरणार्या पालकांमुळे मुलांच्या भाषेचं पार वाट्टोळं होतंय. मग ते मूल मराठी, हिंदी, गुजराती, तेलुगू, बंगाली, सिंधी कुठल्याही मातृभाषेलं असू देत. त्याच्या भाषेचं वाट्टोळं ठरलेलंच. साधारणतः मूल दीड दोन वर्षाचं होईपर्यंत आई बाबा, मामा, काका असे शब्द बोलायला शिकतं. त्यातून बोलणारे लोक घरात जास्त असतील तेवढे त्याच्या कानावर जास्त शब्द पडून मूल आणखी लवकर भाषा आत्मसात करु शकतं. आता आपल्याकडे दोन अडीच वर्षाचं मूल झालं की त्याला शाळेत घालण्याची घाई सुरु होते. त्याचबरोबर प्रतिथयश अति चांगली (?) शाळा शोधण्याची चढाओढही सुरु होते. कहर म्हणजे मूल पोटात असल्यापासूनच मोठ्या नामांकित शाळेसाठी रजिस्टे्शन करुन ठेवण्याचा नवा ट्रेंडही हल्ली फोफावत चाललाय. शाळेच्या सहकार्याने नवीन होऊ घातलेले पालक, या तद्दन मुर्खपणाच्या कृतीला बळी पडत चालेले दिसतात. म्हणजे बाळ जन्माला येण्याच्या अगोदरच त्याच्यासाठी दहा बारा वर्षांच्या कडक नियम असलेल्या कारागृहाची व्यवस्था करुन ठेवली जाते. 35/40 वर्षापूर्वी 5 व्या वर्षी बालवाडी आणि सहाव्या वर्षी पहिली असं गणित असायचं, एखादं वर्ष उशीर झाला तरी फारस काही वाटत नसे. शिवाय नापास होण्याची प्रथाही प्रचलित होती. पण आता शिकले सवरलेले पालक आपल्या पाल्याच्या एकेका वर्षावर, महिन्यावर, वर्षभरातल्या एकेका दिवसांवर लक्ष ठेऊन असतात. तिसर्या चौथ्या वर्षापासूनच मूल घरापासून आई-वडिलांपासून काही तासांसाठी लांब जातं. ज्या वयात त्यांच्या जास्तीत जास्त सानिध्यात राहून भाषा शिकायची त्या वयात त्याच्या कानावर इंग्रजीची अनोळखी वाक्यंच्या वाक्यं आदळत राहातात. वर्गात आपल्याच वयाची अशी दुसरीही मुकी बाळं असतात. त्यांना त्यांच्याशी खेळायचं असतं. खूप खूप बोलायचं असतं. पण तिथे एक अनोळखी व्यक्ती (त्यांना शिकवणारी) एक अनोळखी भाषा घेऊन एकटीच बोलत असते. मग ही बाळं हसण्या, रडण्यासोबत एकमेकांकडे आणि त्या शिकवणार्या बाईकडे मिटीमिटत्या डोळ्यांनी, भेदरलेल्या नजरेनी, निरागस मुक्या चेहर्यांनी फक्त बघत असतात. इथेच आपण त्यांच्या भाषिक विकासाच्या पहिल्या पायरीवरच कुदळ मारत असतो.
दुसरा घाव असतो तो त्यांच्या घरी बोलल्या जाणार्या मातृभाषा आणि शाळेत बोलल्या जाणार्या इंग्रजी शब्दांमधल्या तफावतीमुळे. घरी घरचे लोक एखाद्या विशिष्ट गोष्टीला, वस्तूला ज्या नावाने संबोधतात त्याच गोष्टीला शाळेत दुसरंच काहीतरी म्हणतात. जसे नाक, डोळे, कान, हात, केस या आपल्या अवयवांची मातृभाषेतून ओळख होताहोताच शाळेत मात्र नोज,आईज,हँड,हेअर असं का म्हणायचं हे त्याला समजत नाही अशा अनेक शब्दांच्या दुहेरी अर्थांमुळे मुलं गोंधळात पडतात. बरं मुलं जशी जशी मोठी होत जातात. पुढच्या वर्गात जातात तसतसा हा गोंधळ आणखीच वाढत आतो.
आता तर पालकांनी मूळ मराठीतले शब्द मुलांना शिकवण्याऐवजी किंवा त्याला पर्यायी इतर शब्द त्यांच्या गमतीजमतीसह सांगण्याऐवजी स्वतःच त्या शब्दांचे इंग्रजीतून उच्चार करुन दोन भाषेची सरमिसळ करत मुलांशी बोलतात. जसं की “बेटा हरी अप चल, लवकर तुझा ब्रेकफास्ट फिनिश कर पाहू” किंवा “चल ग्रेप्स खाऊन घे” “अॅपल घे” “जोरात जंप करु नको” “चल स्माईल कर” “काय आता हॅपी ना” “लेझीपणा बंद कर” “चल स्टडीला बस” “एकदम फास्ट रनिंग नको करु” “डिनर झाल्यावर माझ्यासोबत वॉक करायला चल हं” “स्टडी करतांना टॉकींग करु नये” अशा आणि कितीतरी ईंग्लिश मिश्रित शब्दांच्या वाक्यांचा भडिमार करत राहातात .
अशी वाक्य मुलं लहानपणापासून ऐकत राहातात आणि तशीच भाषा शिकत राहातात. सातवी /आठवीतल्या काही मुलांना तर वारांची, महिन्यांची नावे सुध्दा मराठीत सांगत येत नाहीत, ग्रेप्सला मराठीत काय म्हणतात? अॅपल, बनाना, राईस, ब्रेकफास्ट ला मराठीत काय म्हणायचं ?असे कितीतरी शब्द आहेत ज्याला पर्यायी मराठीतले शब्द आजच्या पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांना माहीतच नाहीत. आता उदाहरण म्हणून आपण मराठीविषयी बोलतोय, पण हीच अवस्था इतर भाषांची पण आहे. ज्या ज्या कुटुंंबात मातृभाषेपेक्षा इंग्रजी भाषेला श्रेष्ठ मानन्याचा प्रघात पडतोय.
ज्याची मातृभाषा उत्तम असेल, मातृभाषेतलं ज्ञान उत्तम असेल, शब्दसाठा ज्ञात असेल ती व्यक्ती जगातली कुठलीही भाषा शिकू शकते. म्हणून मुलांना मातृभाषा मग ती हिंदी, मराठी, तेलुगू, पंजाबी, बंगाली, गुजराती कोणतीही असो. पूर्णपणे समजायला हवी, मगच त्याला इतर भाषेतले शब्द नीट अवगत होतील. नाहीतर एक ना धड, भाराभर चिंध्या अशी स्थिती निर्माण होईल.
मान्य आहे जगात वावरण्यासाठी इंग्रजी भाषा महत्वाची आहे. पण ती शिकणं, बोलता येणं इतकं कठीणपण नाहीयं. हल्ली इंग्रजी, फ्रेंच, चीनी, स्पॅनिश बोलण्याच्या शिकवण्या घेतल्या जातात. मातृभाषा पक्की असेल तर सहज दुसरी भाषा अवगत होते. त्यासाठी लहानपणापासून आपल्याला येत असलेल्या (अर्धवट) भाषांची मोडतोड करुन बोलण्याची गरज नाहीय.
माझी एक मैत्रीण (इंग्रजी माध्यमातून शिकलेली आणि इंग्रजी बोलणंच प्रतिष्ठेचं आहे असं मानणारी) आहे. ती फारच म्हणजे फारच चमत्कारिक बोलते.
ए वाव ! तुम्हारा सारी बहोत अच्छा है।,
किचन का प्लॅटफॉम वॉश करने मे ना मुझे बहोत हार्ड जाता।, आज मॉर्निंग मे वाटर नही आयी। बरं ती चांगली मराठी भाषिक आहे. पण तिकडे पण तीच तर्हा. द्याव लागतं, करावं लागतं, असंच असतं असे शब्द वापरण्याच्या नादात, “ मी आज लवकर जातं, माझा बंटी ना असं सतत उड्या मारतं” थोडा म्हणून शांत नसतं.” अशी कर्त्याला विपरीत क्रियापदं बदलत असते. “ए जाऊ दे गं उगीच कशाला वावला चर्चा”
आता आपण वावला चर्चा नसून चर्चेला वाव देतोय असं बोलून हे तिला बापडीला कळत नाही. परत बोलतांना सगळे इंग्रजी हेल असतात आवाजात. तिच्याशी बोलतांना घटनेचं गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी शब्दांची होणारी तोडमोड व बदलणारे अर्थ ऐकून हसायला येतं.
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
तयासी मानव म्हणावे का?
या सावित्रीबाईंच्या कवितेप्रमाणे
कर्ता नाही, कर्म नाही,
क्रियापदाचा पत्ता नाही,
त्यासी भाषा म्हणावे का?
हा प्रश्नच आहे.
खरं तर वेगवेगळ्या लोकांशी जास्तीत जास्त बोलणं, विविध गावे, शहरे फिरण वेगवेगळी बोली कानावर पडणं, गप्पा, गोष्टी, विनोद, गाणी, म्हणी, वाक्रपचार या सगळ्यांचा मुलांच्या भाषिक विकासावर परिणाम होत असतो. त्याचे स्वतःच व्यक्तीमत्व बनत असतं. त्यांच्या क्षमतांचा, सुप्त गुणांचा विकास होण्यात भाषिक विकास अतिशय महत्वाचा असतो. परंतु आज बहुतांशी पालक या सगळ्या गोष्टींपासून मुलांना दूर ठेवून लवकरात लवकर मुलांना शाळा लावून मोकळे होतात. मग अभ्यास, ट्युशन, एक्स्ट्रा क्लास, इंग्रजी,फ्रेंच अशापरकिय, विदेशी भाषांच्या सहवासात मातृभाषेपासून ते लांब जातात. माझ्या परिचयातला एक पाचवीचा मुलगा आहे. त्याला प्रश्न विचारा, गोष्ट सांगा, विनोद ऐकवा, हसून बोला, रागावून बोला काहीही करा तो फक्त मान डोलवून अतिशय सामंजसपणे आपल्याकडे बघतअसतो.. मख्ख चेहर्याने पुस्तकात वाचल्यासारखी उत्तरे देतो. आनंद, राग, दुःख, व्देष, मत्सर कुठेच त्याच्या चेहर्यावर दिसत नाही. एका 10/12 वर्षाच्या मुलांचा असा समंजस शांत, गंभीर माणूस का झाला याचं उत्तर मी शोधायला जाते. तेव्हा हेच लक्षात येतं की मातृभाषेची मजा समजून न घेता इतर भाषीक गुंत्यात अडकून मेंदूची भजी झालेली ही मुलं अतिशय केविलवाणी वाटतात मला. अगदी 9/10 वर्षापासून ते चांगली 25/26 वर्षापर्यंतच्या मुलांवर असा परिणाम झालेले खुप लोक मी पाहिलेत. म्हणजेच इंग्रजी माध्यमांचा अट्टाहास, टाय, बेल्ट लावलेली परदेशातल्या सारखा युनिफॉर्म घालून रोज स्कूल बसमधून परवडत नसलेल्या दूरदूरच्या शाळेत जाणारी मुलं पालकांच्या प्रतिष्ठेचा विषय बनत गेली. तेव्हापासून एक अख्खी पिढी आपल्या मातृभाषेपासून दूर जात गेली. फक्त अभ्यास ऐके अभ्यास आणि रट्टा मार व्यवस्थेतांनी ही पिढी स्वतः आई-बाबा बनेल तेव्हा त्या बाळांचे भविष्य काय असेल...?
सारिका उबाळे परळकर
अमरावती
--
Sunday, November 11, 2018
आठवणीतल्या आठवणी
घासरगुंडी
एका संध्याकाळी रोजच्या प्रमाणे मी आणि भाऊ घरापासून जरा लांब रेल्वे स्टेशन च्या परिसरात असलेल्या बागेसारख्या पण बर्याच मोठ्या मोकळ्या मैदानात खेळायला गेलो..
भाऊ रोज यायचा मित्रांसोबत पण मी कधी कधी च. आम्ही राहायचो तो पण खूप मोठा वाडा होता.आलमसाहाब नावाचे ते आजोबा , त्यांचं कुटुंब आणि वाड्यातील बाकी सर्व भाडेकरु मिळून एक मोठ्ठं कुटुंब च होतं ते.
आणि वाडाही खूप मोठा.लाकूड कापायचा कारखाना च होता तो .मग बाहेर जाण्यापेक्षा तिथे पडलेल्या मोठाल्या झाडांच्या खोंडावर , लाकडाच्या ढिगार्यावर आम्ही दिवसभर खेळत असू...भाऊ आमच्या त सगळ्या त मोठा मग तो मित्रांसोबत जरा लांब खेळायला जाई....
तर मग त्या दिवशी मीही त्याच्या सोबत गेले .तिथे एक घसरगुंडी, दोन लटकायचे पोल असं काहीतरी होतं. जे मी केंव्हाही जाता येता पहायचे.. आणि त्यावर खेळायला यावं असा विचार करत तिथून आई किंवा अण्णा चा हात धरुन विचार करत करत जायचे.तर मग आज चांस आला होता.जरा भीत भीतच मी घसरगुंडी च्या मागच्या बाजूच्या पायर्यांनी वर चढले एक आठ दहा पायर्या असतील.त्याची उंची ती किती असणार पण वर चढल्यावर मात्र मी प्रचंड घाबरले .खूप उंचीवरून खाली पाहत जाम घाबरले. खाली घसरत येण्याची हिंम्मत काही होईना. आणि पायर्या पण उतराव्याशा वाटेनात .भाऊ माझ्या पेक्षा काय दोन अडीच वर्षे मोठा.तसे आम्ही दोघेही लहान च फार फार तर सहा आणि आठ वर्षांच्या आसपास असू .नक्की आठवत नाही. चढून तर बसले.उतरता येईना घसरताही येईना.चांगलीच पंचाईत झाली होती. भाऊ ही काही करु शकत नव्हता. .
मी मात्र त्याच नावाने आईच्या नावाने टाहो फोडला होता. त्यालाही काही सुचत नसावे.एखाद्या मित्राला किंवा मोठ्या माणसाला बोलवावे म्हणून तो इकडे तिकडे पाहू लागला.आणि मग थोड्या वेळाने तो ही दिसेना..मी अजूनच घाबरले .मोठमोठ्याने रडू लागले.आता माझं कसं होणार. ? आई अण्णा ला पण माहित नाही आम्ही इकडे आहोत.आता खाली उतरायचं कसं..? रात्र झाली तर..? तेवढ्यात मला माझ्याजवळ बुरख्यातले दोन हात दिसले.त्या हातात काचेच्या बांगड्या सोबत रंगीबेरंगी खड्यांचे दोन दोन कंगण पण होते.हात मला घेण्यासाठी पुढे आले आणि मी सरळ स्वतः ला झोकून दिलं.त्या बुरख्याला चेहरा नव्हता. एक मंद वासाचं अत्तर तिच्या जवळ दरवळलं .इदच्या वेळी शिरखूरर्मा, मेंदी आणि अत्तराचा संमिश्र वास यावा तसं.....
बस्स. ....
पुढचं काही म्हणजे का...ही आठवत नाही. ते बुरख्यातले करुणेचे डोळे आणि कंगणवाले दोन हात... आठवतात फक्त. .. आजही.
आठवणीतल्या आठवणी
नागी
कधीतरी आपसूकच मन दूर..दूर ..चालत जातं.हरवलेल्या मैत्रिणी शोधत.खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दू..र निघून गेलेल्या..
बालवयातल्या.जात धर्म यांच्या पलिकडच्या....मैत्रीणी.
बालपणात शिरलं की आलम साहब आजोबांच्या वाड्यातच धावत जातं मन..त्याशिवाय पर्याय च नसतो काही.
शुभ्र कपडे पायजामा व नेहेरु शर्ट .तोंडाने काहीतरी नामस्मरण. मागे बांधलेले हात .हातातली जपमाळ .त्याचा रेशमी गोंडा.सगळ्या वाड्यातल्या लहान मुलांवर लक्ष ठेवत इकडून तिकडे फेर्या मारणारे अब्बा....कारखान्यात इस्ततः पसरलेल्या मोठाल्या लाकडाच्या ओंडक्यांवर आम्ही नदी की पहाड खेळत असू.कधी मोठ्या ओंडक्यांच्या मागे लपणा छपणी (हा बालपणीचा शब्द) तर कधी नुस्तंच ओंडक्यावर गप्पा मारत बसायचो. एक एक ओंडका सहा सात महिने पडून राहायचा .आणि त्या वर अक्षरशः जीव जडायचा .अचानक एखाद्या दिवशी मग तो कापण्यासाठी उचलून आरीजवळ अर्धवट अवस्थेत दिसायचा किंवा त्याचं अनेक फळ्यांमधे रुपांतर झालेलं दिसायचं..त्याची जागा सूनी सुनी वाटायची अन् उगाच गलबलून यायचं..वाड्याच्या कोपर्यात एका छोट्याश्या झोपडीत नागी राहायची. आरीवर लाकूड कापणार्या हानू ची मुलगी. हानू वाड्यात सगळ्यांची मेहनतीची कामे करुन द्यायचा..नेहेमी हसतमूख. एक छिद्र पडलेली बनियान आणि लुंगी .लाकूड कापत असेल तर एक रबरी एप्रन त्याच्या गळ्यात अडकवलेलं असायचं .आणि एक मोठा पॅक बंद चष्मा. .त्याला पूर्ण कपडे घातलेला कधी कोणी पाहिला च नाही.बारिक डोळे , पसरट नाक मजबूत बांधा...याउलट त्याची बायको नाजूक गोरी , कुरळ्या पिंगट केसांची , पिंगट डोळ्यांची .ती दिवसभर काम करायची .तिला मराठी बोलता येत नव्हतं. घरमालकाकडे काम करुन थोडंबहूत हिंदी यायचं.ती फेंट कलरचे नऊवारी पण खूप छोटे छोटे पातळ नेसायची.नागीशी ती गोंडी भाषेत च बोलायची.नागी....... अशी घोगर्या आवाजातली हाक ऐकली की ,'बता...ल' म्हणत नागी पळतच जायची.आईची तिला खूप काळजी वाटायची.कारण दिवसभर कामाने थकलेला हनू संध्याकाळी दारु प्यायचा आणि बायकोला खूप मारायचा.मग सकाळी ती काही कामानिमित्त वाड्यात आली की तिचा चेहरा सुजलेला, कधी डोळा काळा निळा पडलेला तर कधी तिच्या गोर्या चेहेऱ्यावर व्रण दिसायचे. आईसगट वाड्यतल्या इतर बायकाही हळहळायच्या. अन् ती काहीच न समजून किंवा समजूनही असेल कसंनूसं हसत राहायची. ' किती मारलं गं माय कडू भाड्यानं" या वाक्यानं मलाही हनूमामाचा राग..राग.. यायचा. संध्याकाळी स्वैपाकाच्या वेळी आई मला माझ्या छोट्या भावाला कडेवर द्यायची ."ह्या ला जरा न्ह्या गं घंटाभर कूठतरी"...हे ऐकून ऐकून तो सुध्दा" मला जरा न्ह्या ये कूटतरी घंटाभर" असं म्हणून दोन्ही हात पसरायचा वर्षा दिड वर्षाच्या छोट्या भावाला कडेवर घेऊन मग मी लाकडांवर नागीसोबत खेळायला जायचे.त्याला घेउन खेळता यायचं नाही. मग आम्ही गप्पा मारत त्याला संध्याकाळी आकाशात उडत परतणारे पोपट , कावळे, बगळे दाखवत बसायचो.वाड्याच्या मागेच मस्जिद होती .बहुधा पाच साडेपाचला अल्लाहू अकबर अल्ला... अशी आजान व्हायची .त्यावेळी मी नागी , छोटा रेणू तर कधी कधी वाड्यातली इतर मराठी लहान मुलं आब्बाच्या घरात नमाज पडणार्या अम्मी संजिदा, नाहेदा बाजी आणि घरातली इतर नोकर मंडळी कडे कितीतरी वेळ कुतूहलाने बघत बसायचो.त्याआधी नळावर अम्मी वजू करायची ते बघायचो...आणि वेळ कसा जायचा ते कळायचंच नाही. त्यांना ते सगळं करताना बघणं हा एक सोहळा च होता.
सरळ नाकाची , मोठ्या सुंदर डोळ्यांची गो..री अम्मी आणि त्यांच्या सुंदर पोरी कपाळापट्टी झाकून कानामागे सारलेली ओढणी अंगाभोवती गुंडाळून घ्यायच्या आणि डोळे मिटून, दोन्ही तळवे वर धरायच्या तेव्हा आम्हाला ही तस्संच करुन अल्लाकडे दुवा मागावीशी वाटायची..मग इकडे आमच्या अड्ड्यावर येऊन आम्ही ते करुन घ्यायचो.अगदी मनोभावे.नागी जवळपास माझ्या च वयाची पण खूप थोराड वाटायची.तिची आई गोरी असूनही नागी मात्र गोरी नव्हती. तिचं नाक थोराड आणि बसकं होतं .ओठ बाबरे होते.आणि केस कुरळे.ती त्या दोघांपेक्षाही खूप च वेगळी दिसायची.तिला रेणूला सांभाळायला खूप आवडायचं त्याला घेउन माझाही हात अवघडून जायचा.मी तिला त्या बदल्यात आईने खिशात दिलेले काजू, भाजके शेंगदाणे, षटकोनी खारे बिस्किट द्यायचे.नागी अजूनच खूश व्हायची.शाळेची वेळ सोडून सकाळ संध्याकाळ सुट्टी चा दिवस मी नागी फरजाना, शमीम, निर्मला लाकडांमधे हुंदडत राहायचो. लाकूड कापताना बघत तासंतास तिथे उभे राहायचो.अब्बाशी डिल करण्यासाठी बरीच लोकं येत राहायची.मग अब्बा आम्हाला 'अगे अम्मा चलो अंदर जाओ गे...'म्हणत ऑफिसात शिरायचे आणि आम्ही थेट त्यांच्या घरात .तिथे कधी बायका पान खात बसलेल्या असायच्या तर कधी तखत पोशावर बसून जेवत. मग आम्ही दुसर्या दरवाजातून धूम ठोकायचो. नवीन घर बांधाल्यावर त्या धावपळीत, उत्साहात इकडे राहायला आल्यावर काही दिवसात नागी कूठे , कशी हरवली कळलं नाही. . त्यानंतर कधी कधी स्टेशन च्या रस्त्यावर अब्बा च्या वाड्यासोरुन जातांना ती भेटायची.मग आम्ही गप्पा करताना अम्मी चष्म्यातून बघत आवाज द्यायची..'कोन है गे ...?
काशिराम की बेटी की.....? सारिखा..?
अई इधर आ गे मा....कितनी बडी हो गयी गे....
मग मी अम्मीकडे नी नागी घराकडे धूम ठोकायची... आता वाड्यात अम्मी आहे ना अब्बा ना नागी....त्या लाकडाच्या ओंडक्याच्या रिकाम्या जागेसारखं सूनं सूनं सगळं.
गावी गेल्यावर कधीतरी तिकडून जातांना तसंच गलगलबलून येतं ..अजूनही...
कूठे असेल नागी...?
आठवणीतल्या आठवणी
संतोषी माता
"ऐ आज शुक्रवार आहे. काहीही आंबट चिंबट खायचं नाही रे पोरांनो ...,शाळेत कुणाच्या डब्याला हात नाही लावायचा.,कुणाच्याच घरचं काही खायचं नाही." आई सकाळी सकाळी च सुचना द्यायची. त्या दिवशी मग विना आंबटाचा स्वैपाक. लोंणचं नाही, लिंबू नाही ,उन्हाळा असेल तर कैरी आंबे सगळ्या वर पाणी सोडून मुकाट तोंडाला आलेलं पाणी गिळत बसावं लागे .दर शुक्रवारी हे असं चालायचं आईचं .कधी कधी आम्हा मुलांना घेऊन संतोषी मातेच्या मंदिरात जायची आई .घरापासून लांब दोनेक किलोमीटर असावं..उन गर्मी ..त्यात मंदिरात प्रचंड गर्दी असायची .बारा वा. संतोषी मातेची आरती असायची .त्या वेळी समोर एक उंची पूरी सावळी तोंडावर देवीचे व्रण असलेली लुगडेवाली बाई घामाघूम होऊन घूमत असायची..कपाळावरचं तिचं भलं मोठं लाल कुंकू घामात मिसळून ओघळत असायचं..तिने घालेलं पोपटी गर्द लुगडं, तो चेहरा आजही तस्साच आठवतो .मंदिराच्या गुळगुळीत पिवळ्या भिंती फरशी सगळं डिक्टो डोळ्यासमोर आहे अजून...
गर्दी, घाम ,भीती चिडचिड, राग अशा संमिश्र भावना दाटून यायच्या ..आई सोबत असूनही असुरक्षित वाटून रडायला यायचं. कारण आईनेच धाक घातलेला असायचा , थोडं जरी काही चुकलं , आंबट चिंबट खाल्लं , आंबटाला हात लागला तर संतोषी माता नाक कापेल..मग काय मंदिरातून केंव्हा एकदा बाहेर पडतो असं व्हायचं. .माझा छोटा भाऊ तर नाकावर हात ठेवून च असायचा..कारण त्यानं चुकून हमखास आंबट खाल्लेलंच असायचं...गुळ फुटाण्याचा प्साद घेऊन मग बाहेर पडायचो.तोही खावा की नाही हा मोठा प्रश्न ..नाही खाल्ला तर आईला कळेल आपण आंबट खाल्लेलं ..आणि खाल्ला तर ती नाक कापेल की काय ही भीती...
मग रात्री झोपताना पण भीतीच वाटायची त्या संतोषी बयेची......
तर असा तो संतोषी मातेचा महिमा...
आम्ही सगळ्यांनी चुकून कधीतरी आंबट खाल्लेलच आहे. आईच्या माघारी ..पण आमची नाकं मात्र अजून साबूत आहेत ..चांगली तरतरीत...
Saturday, November 10, 2018
आठवणीतल्या आठवणी
चक्कीतली म्हातारी
तिने मानगुट पकडलीय माझी. गांगरुन गेलेय मी इदी एक्कूडा जागूरतुन्नदी? (ए कुठं चाल्ली?) इथ्यू पिंडी (पिठ दे) जाड जाड चष्म्याच्या भिंगातून दिसणारे तिचे भयंकर डोळे, पिठाने भरलेले केस. पिठाचाच चेहरा. पिठाचेच कपडे. पिठाने भरलेल्या हडकुळ्या हाताने तिने माझ्याजवळचा पिठाचा डबा धरलाय. सोडेचना! सोडेचना! चिडलेली ती अन् अपराधी मी. मग कसानूसा चेहरा करुन, रडकुंडीला येत... गरम गरम पिठाचा डबा मी कशी-बशी खाली घेते. डब्यातले वरवरचं थंड झालेलं पीठ मी दोन्ही हातांनी तिच्या पांढर्या वॉनस्टिकच्या जागोजागी कपचे उडून खरवडल्यासारखा काळा भाग दिसणार्या मोठ्ठ्या कटोर्यात टाकते. माझे दोनही हात तिच्या हातासारखेच पांढरे पांढरे होतात. पिठाळ पिठाळ. पिठाळ बोटं, माझे पिठाळ हात, तिचे पिठाळ हात, चक्कीवाल्याचे केसाळ पिठाळ हात पिठाळच हात दिसू लागतात सर्वत्र चक्कीत. मी माझा डबा उचलून पळून जायला पाहते पट्कन.
इंक्का, इंक्का (अजून) अजूक दे ना ए बिड्ड्या (ए पोरी) अजूक दे तोडं...मी घाईघाईने वळते चक्कीचा पांढरा लाकडी उंबरा ओलांडते शिताफीनं चटकन् ...
मग बाहेर पडल्यावर माझ्यासोबत आलेल्या पण माझ्या नि म्हातारीच्या पिठासाठीच्या झटापटीत पटक्न आपला डबा घेऊन बाहेर पळून आलेल्या उज्ज्वलाला मी दुषणं देत राहाते. कशी तू उज्ज्वला? आधीच देऊन टाकायला पाहिजे होतं. आपण थोडंसं पीठ म्हातारीला नाही गं बाई... मी तर कधीच देत नाही तिला पिठ, पळूनच येते. माझी आई रागावते नं मला घरी गेल्यावर तू पण पळून यायचं होतं पटकन नं...? पण तू घाबरली- उज्ज्वला.
ए पण खरंच खूपच बदमाशय ती म्हातारी.
मला तर भितीच वाटते बा तिची. मी
हो... मी भ्यायचे तिला खूप... बटबटीत डोळ्यांची. पिठात भरलेली जुनाट म्हातारी. जाड जाड भिंगाचा धुरकट काचांचा एकच काडी असलेला गोल चष्मा तिच्या डोळ्यांवर दुसर्या बाजूला साडीच्या कापडाची खूप जुनाट, पिठाळ पिठाळ दोरी कानात गुंडाळल्यासारखी अडकवलेली. काळीच म्हणता येईल अशी बारीक शेड. गालावरची हाड वर आलेली, पान खाऊन लाल पिवळे झालेल्या किंचित वर असलेल्या दातांची म्हातारी दळण घेऊन तिला पिठ न देणार्याच्या अंगावर धाऊन जायची कातिनीसारखी आणि वाटीभर पिठ शोधून घ्यायची डब्यातलं. निसटून जाणार्याला चपळाईनं पकडायची उठून आणि भांडायचीच खडाखडा. तेलगूमधून शिव्या द्यायची. घाणेरड्या गरिबाला नायी देते बाडकाड ऑ...?
कदी बरं होते नायी तुजं...
तेलगू हेल काढून मराठीत शापायची त्याला.
जुना...ट, पिठा...ळ, वाळली म्हातारी.
दुपारच्या वेळी चक्कीवाला जेवायला जायचा घरी. तेंव्हा शेणाने सारवूनही पिठाने पांढुरक्या झालेल्या जमिनीवर तिच्या रोजच्या जागेवरुन जरा लांब कोपर्यात बसून ती ही जेवत असायची निवांत.
कधी कधी दुपारी दळणासाठी नंबर लावून ठेवण्यासाठी जायचो आम्ही. तेंव्हा ती भिंतीकडे तोंड करुन उकीडवं बसून जेवत असायची. जर्मनच्या डब्यात कसल्याश्या पातळ भाजीत भाकरीचा/पोळीचा काला करुन मांजरीप्रमाणे शांत डोळे मिटून, आपल्या लाल पिवळ्या दातांनी चघळत राहायची आरामात.
दळण ठेऊन पटकन् खेळायला जायचं असायचं आम्हाला. सगळ्या चक्कीभर तिच्या डब्यातल्या भाजीचा वास पसरलेला असायचा. आमचीही भूक खवळायची तेंव्हा. मग सरळ घरी जाऊन आईला जेवायला मागायचं... तर त्याच वासाची भाजी किंवा आमटी घरी.
कारण तिने आमच्याच घरुन नेलेलं कोरड्यास असायचं ते. जेवायच्या आधी एक जर्मनचा कडीचा डबा घेऊन ती घरी यायची. दारातूनच जरासं कोड्ड्यास दे ना बाई म्हणत तो डबा तिथेच ठेऊन बाथरुमला जाऊन यायची. आमच्या घरापुढे भले मोठे पिवळ्या रंगाचे दगडी गोदाम होते दोन. त्याच्या मागे काटेरी बाभळींची मोठाली झुडूपे होती. त्या कुचकाट्यात कुठेतरी ती बाथरुमला जाण्यासाठी आमच्या घरासमोरुन जायची. येता जाता कधी आमच्या तर कधी आमच्या शेजारच्या घरुन भाजी घेऊन जायची आणि घरुन आणलेली शिळी-पाळी भाकरी,पोळी त्यात काला करुन खात बसायची. भाकरी, पोळीची चिंता नसायची तिला. इथे मिळणार्या पिठावर भागायचं तिचं.
आमच्या घरापासून अगदी जवळ घरामागेच असलेली ही चक्की पुर्णपणे लाकडी फळ्यांचीच होती. चहू बाजूंनी लाकडी फळ्या आणि वर कौल. खाली सारवलेली जमिन. दळण ठेवण्यासाठीपण लाकडी फळ्यांचाच भला मोठा ओटा होता तो पूर्ण भरल्याशिवाय चक्की सुरु होत नसे. ओटा जिथून सुरु होतो तिथे चक्कीचं जातं असलेली मशिन वर मोठ्ठं पत्र्यांचं बनवलेले चौकोनी आ वासलेलं तोंड. त्यात चक्कीवाला डब्यातलं दळण रिकामं करायचा. खालून दळलेलं पीठ बाहेर येण्यासाठी भली मोठी लोखंडी तोटी होती. दळलेलं पीठ बरोबर डब्यात पडावं आणि उडू नये म्हणून त्याला एक भलं मोठं जाड कापड गोल करुन बांधलेलं. ते खरंच जाड होतं की पिठामुळे जाड झालं होतं माहित नाही. त्याचा रंगही मुळात पांढराच होता की पिठामुळे, याचंही उत्तर माहित नाही. त्याच्याखाली एक सिमेंटनी लिंपलेला खड्डा होता. लोखंडी पट्ट्यांच्या जाळीने झाकलेला- दळणाचा डबा ठेवण्यासाठी दळण टाकून खाली ठेवेपर्यंतच्या वेळात पडणारं पिठ या सिमेंटी खड्ड्यात पडायचं. त्या जमा होणार्या पिठावर या पिठाळ म्हातारीचा अधिकार असायचा. या सगळ्यामुळे तिच्या घराला थोडाफार हातभार लागत असे. गरिबीसोबत तिच्याकडे लोकांना काहीही जबरदस्तीने मागण्यांचे अधिकार होते. दिवाळी, दसरा, होळी, ईद अशा सणांच्या वेळी दुसर्या तिसर्या दिवशी वेळातला वेळ काढून ती सण मागायला येत असे. पण तिच्या मागण्यात विनंती नसायचीच कधी. तेलगू मराठी मिश्रित भाषेत खडखड करुन ती समोरच्याला दयायला भाग पाडत असे. सण मागणारीही ती एकटी नव्हती. कुठूनतरी घार्या घार्या डोळ्यांच्या सुंदर सुंदर पारधी बाया पाठीला लेकर बांधून यायच्या. कधी कधी मसणजोगी तर कधी वेषांतर करुन करमणूक करणारे. या सगळ्यांच्या आधी आपण मागून घेतलं पाहीजे यासाठी चक्कीतली म्हातारी दक्ष असे. घरी मुलगा, सून, 2/3 नातवंड त्यांच्यात कायम जीव गुतलेला तिचा. सोमवारी चक्की बंद असे. त्यातलं जातं टाकवण्याचं काम चाले. म्हातारी तेंव्हा खूप मोठ्ठ शेण घेऊन त्यावर पाणी टाकून कधी फड्याने, कधी पोतेर्याने तर कधी हातानेच जमिन सारवून घेई. उंबर्याबाहेर शेणाचा सडा टाके. हे शेण तिने एक दोन दिवस अगोदर भांडून तंडून, रस्त्यावरचं उचलून जमा केलेलं असे.
चक्कीत असलेल्या फळ्यांच्या पोकळ ओट्याखाली भला मोठा कापडी पट्टा होता. चक्की सुरु असतांना त्याचा फटाक् फटाक् असा आवाज होई. ओट्याच्या पलीकडे एका लाकडी खुर्चीवर चक्कीवाला मुन्नाभाई किंवा त्याचा मोठा भाऊ जहिरभाई आलटून पालटून बसत असत. त्याचे कपडे, डोक्यावरचे केस, मिशा, नाकातले केस, पापण्या, हातावरचे, बनियानमधून दिसणार्या छातीवरचे केस पिठाचे होते. चक्कीचा घर...घर...आवाज, पट्ट्याचा फट्फट् आवाज यात बोललेले सगळे आवाज दबून जात. खूप मोठ्यानं बोलावं लागे (ओरडून ओरडून) चक्कीवाला शांतपणे रांगेतले डबे रिकामे करुन दळणाचे पैसे आपल्या बनियान वजा बंडीच्या पोटावरल्या मोठ्या खिशात ठेवत असे. तो खिसा नेहेमी पैशांनी फुगलेला असे. अधून मधून कुणाची असलेली उधारी लिहून ठेवण्यासाठी त्यांच्या मांडीवर एक दुमडलेली डायरी आणि कानावर एक पेन खोचलेला असे.
उज्ज्वला नेहमी चक्कीवाल्याच्या खुर्चीला धक्का मारुन तो पडला की त्याच्या पोटातली चिल्लर घेऊन पळून जाण्याचा प्लॅन मला बोलून दाखवत असे. त्या पैशात खूप आईस्क्रेट, कुल्फ्या, नरडं येतील असं अमिष पण मला दाखवत असे. पण मी तिला तु असं कधीच करु शकणार नाहीस आणि करायला गेली तरी ही म्हातारी तुला तसं करुच देणार नाही असं तंडून तंडून पटवून देण्याचा प्रयत्न करत असे.
आणि मग मला खाली पडलेला, पिठात असलेला मुन्नाभाई, चक्कीभर सांडलेली चिल्लर, ती वेचत असतांना म्हतारीने पकडलेली उज्ज्वला दिसत राही.जाड भिंगाचा, कापडी दोर्यांनी बांधलेला चष्मा घातलेली, ती पिठाळ म्हातारी तिला बुकलून काढत आहे. चक्कीवाला पण उठून उज्ज्वलाचे कान पिळून तिला पोलिसात देण्याच्या धमक्या देत आहे असे दिसून मी घाबरुन उज्ज्वलाला चक्कीतच सोडून पळून जात असे.
मागील पंचवीस, तीस, पस्तीस वर्षात चक्की अजून तिथेच आहे. लाकडी फळ्यांची जागा भिंतींनी घेतलीय एवढाच काय तो बदल. कितीतरी म्हातार्या आल्या नि गेल्या. त्या कधीच दखलपात्रही नव्हत्या. पण माझ्यासारख्या अनेकांच्या ठराविक जिवनपटलावर त्या कायमच्या कोरल्या गेल्यात. कधी करुणा, कधी उपहास, थट्टा, चेष्टा, लाचारी तर कधी भीती बनून. पिठाळ कातिनीसारख्या.
सारीका उबाळे
अमरावती
--