Thursday, January 3, 2019


स्वतंत्र भारत धुळे
आभार मा. संपादक ..

           व्हाँट इज युवर भाषा ?

समोर बसलेल्या आठ नऊ वर्षाच्या मुलांमध्ये सौम्य भांडण.एकाचे फुगलेले गाल,रागावलेला चेहेरा ,ताणलेल्या भुवया तर दुसऱ्या चा त्रासिक चेहेरा पाहून त्यांना जवळ बोलावलं..
मुलांशी बोलतांना प्रत्येक वेळी ईंग्रजीतच बोललं पाहीजे या नियमाला जाणिवपुर्वक अव्हेरुन अभ्यासाव्यतिरिक्तचे प्रश्न मी मराठीतच विचारते.माझा विषयच मराठी असल्याने मी तसं करु शकते..
आणि  विद्यार्थी ही माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतात....
तर

What happen ’ च्या ऐवजी ‘काय झालंय?’ विचारताच दोन्ही गोड गोबर्‍या मुलांपैकी त्रासिक चेहर्‍यावाला उत्तरला,
“मीस.... मै ना, चूपचाप बैठा ता तो यानं नयी क्या... मेरे डोळे मे बोट टोचा....” त्याचं बोलून पूरं व्हायच्या आतच दुसरा बोलला “नयी मिस नयी मिस... हा खोटा बोलरा है।” इसनेयीच नयी क्या,  ऑ..? नयी क्या मेरे पोट मे बुक्की मार्‍या”
हातवारे करुन करुन आपलं म्हणणं पटवून देणार्‍या आणि जेमतेम येणार्‍या भाषेची सरमिसळ करणार्‍या त्या इटुकल्यांकडे पाहून हसू येत होतं तर दुसरीकडे तेवढीच काळजी वाटत होती. कारण अगदी पहिल्या दुसर्‍या वर्गापासून ते आठवी नववीतल्या विद्यार्थ्यांची हीच अवस्था होती.
आजकाल इंग्रजी माध्यमांच्या शाळेचं वाढतं प्रस्थ श्रीमंतांपासून ते गोरगरिबांच्या आपल्या मुलांना  इंग्रजीतून शिक्षण देण्याचा अट्टहास धरणार्‍या पालकांमुळे मुलांच्या भाषेचं पार वाट्टोळं होतंय. मग ते मूल मराठी, हिंदी, गुजराती, तेलुगू, बंगाली, सिंधी कुठल्याही मातृभाषेलं असू देत. त्याच्या भाषेचं वाट्टोळं ठरलेलंच. साधारणतः मूल दीड दोन वर्षाचं होईपर्यंत आई बाबा, मामा, काका असे शब्द बोलायला शिकतं. त्यातून बोलणारे लोक घरात जास्त असतील तेवढे त्याच्या कानावर जास्त शब्द पडून मूल आणखी लवकर भाषा आत्मसात करु शकतं. आता आपल्याकडे दोन अडीच वर्षाचं मूल झालं की त्याला शाळेत घालण्याची घाई सुरु होते. त्याचबरोबर प्रतिथयश अति चांगली (?) शाळा शोधण्याची चढाओढही सुरु होते. कहर म्हणजे मूल पोटात असल्यापासूनच मोठ्या नामांकित शाळेसाठी रजिस्टे्शन करुन ठेवण्याचा नवा ट्रेंडही हल्ली फोफावत चाललाय. शाळेच्या सहकार्याने नवीन होऊ घातलेले पालक, या तद्दन मुर्खपणाच्या कृतीला बळी पडत चालेले दिसतात. म्हणजे बाळ जन्माला येण्याच्या अगोदरच त्याच्यासाठी दहा बारा वर्षांच्या कडक नियम असलेल्या कारागृहाची व्यवस्था करुन ठेवली जाते. 35/40 वर्षापूर्वी 5 व्या वर्षी बालवाडी आणि सहाव्या वर्षी पहिली असं गणित असायचं, एखादं वर्ष उशीर झाला तरी फारस काही वाटत नसे. शिवाय नापास होण्याची प्रथाही प्रचलित होती. पण आता शिकले सवरलेले पालक आपल्या पाल्याच्या एकेका वर्षावर, महिन्यावर, वर्षभरातल्या एकेका दिवसांवर लक्ष ठेऊन असतात. तिसर्‍या चौथ्या वर्षापासूनच मूल घरापासून आई-वडिलांपासून काही तासांसाठी लांब जातं. ज्या वयात त्यांच्या जास्तीत जास्त सानिध्यात राहून भाषा शिकायची त्या वयात त्याच्या कानावर इंग्रजीची अनोळखी वाक्यंच्या वाक्यं आदळत राहातात. वर्गात आपल्याच वयाची अशी दुसरीही मुकी बाळं असतात. त्यांना त्यांच्याशी खेळायचं असतं. खूप खूप बोलायचं असतं. पण तिथे एक अनोळखी व्यक्ती (त्यांना शिकवणारी) एक अनोळखी भाषा घेऊन एकटीच बोलत असते. मग ही बाळं हसण्या,  रडण्यासोबत एकमेकांकडे आणि त्या शिकवणार्‍या बाईकडे मिटीमिटत्या डोळ्यांनी, भेदरलेल्या नजरेनी, निरागस मुक्या चेहर्‍यांनी फक्त बघत असतात. इथेच आपण त्यांच्या भाषिक विकासाच्या पहिल्या पायरीवरच कुदळ मारत असतो.

दुसरा घाव असतो तो त्यांच्या घरी बोलल्या जाणार्‍या मातृभाषा आणि शाळेत बोलल्या जाणार्‍या इंग्रजी शब्दांमधल्या तफावतीमुळे. घरी घरचे लोक एखाद्या विशिष्ट गोष्टीला, वस्तूला ज्या नावाने संबोधतात त्याच गोष्टीला शाळेत दुसरंच काहीतरी म्हणतात. जसे नाक, डोळे, कान, हात, केस या आपल्या अवयवांची मातृभाषेतून ओळख होताहोताच शाळेत मात्र नोज,आईज,हँड,हेअर असं का म्हणायचं हे त्याला समजत नाही अशा अनेक शब्दांच्या दुहेरी अर्थांमुळे मुलं गोंधळात पडतात. बरं मुलं जशी जशी मोठी होत जातात. पुढच्या वर्गात जातात तसतसा हा गोंधळ आणखीच वाढत आतो.
आता तर पालकांनी मूळ मराठीतले शब्द मुलांना शिकवण्याऐवजी किंवा त्याला पर्यायी इतर शब्द त्यांच्या गमतीजमतीसह सांगण्याऐवजी स्वतःच त्या शब्दांचे इंग्रजीतून उच्चार करुन दोन भाषेची सरमिसळ करत मुलांशी बोलतात. जसं की “बेटा हरी अप चल, लवकर तुझा ब्रेकफास्ट फिनिश कर पाहू” किंवा “चल ग्रेप्स खाऊन घे” “अ‍ॅपल घे” “जोरात जंप करु नको” “चल स्माईल कर” “काय आता हॅपी ना” “लेझीपणा बंद कर” “चल स्टडीला बस” “एकदम फास्ट रनिंग नको करु” “डिनर झाल्यावर माझ्यासोबत वॉक करायला चल हं” “स्टडी करतांना टॉकींग करु नये” अशा आणि कितीतरी ईंग्लिश मिश्रित शब्दांच्या  वाक्यांचा भडिमार करत राहातात .
अशी वाक्य मुलं लहानपणापासून ऐकत राहातात आणि तशीच भाषा शिकत राहातात. सातवी /आठवीतल्या काही मुलांना तर वारांची, महिन्यांची नावे सुध्दा मराठीत सांगत येत नाहीत, ग्रेप्सला मराठीत काय म्हणतात? अ‍ॅपल, बनाना, राईस, ब्रेकफास्ट ला मराठीत काय म्हणायचं ?असे कितीतरी शब्द आहेत ज्याला पर्यायी मराठीतले शब्द आजच्या पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांना माहीतच नाहीत. आता उदाहरण म्हणून आपण मराठीविषयी बोलतोय, पण हीच अवस्था इतर भाषांची पण आहे. ज्या ज्या कुटुंंबात मातृभाषेपेक्षा इंग्रजी भाषेला श्रेष्ठ मानन्याचा प्रघात पडतोय.
ज्याची मातृभाषा उत्तम असेल, मातृभाषेतलं ज्ञान उत्तम असेल, शब्दसाठा ज्ञात असेल ती व्यक्ती जगातली कुठलीही भाषा शिकू शकते. म्हणून मुलांना मातृभाषा मग ती हिंदी, मराठी, तेलुगू, पंजाबी, बंगाली, गुजराती कोणतीही असो. पूर्णपणे समजायला हवी, मगच त्याला इतर भाषेतले शब्द नीट अवगत होतील. नाहीतर एक ना धड, भाराभर चिंध्या अशी स्थिती निर्माण होईल.
मान्य आहे जगात वावरण्यासाठी इंग्रजी भाषा महत्वाची आहे. पण ती शिकणं, बोलता येणं इतकं कठीणपण नाहीयं. हल्ली इंग्रजी, फ्रेंच, चीनी, स्पॅनिश बोलण्याच्या शिकवण्या घेतल्या जातात. मातृभाषा पक्की असेल तर सहज दुसरी भाषा अवगत होते. त्यासाठी लहानपणापासून आपल्याला येत असलेल्या (अर्धवट) भाषांची मोडतोड करुन बोलण्याची गरज नाहीय.

माझी एक मैत्रीण (इंग्रजी माध्यमातून शिकलेली आणि इंग्रजी बोलणंच प्रतिष्ठेचं आहे असं मानणारी) आहे. ती फारच म्हणजे फारच चमत्कारिक बोलते.

ए वाव ! तुम्हारा सारी बहोत अच्छा है।,
किचन का प्लॅटफॉम वॉश करने मे ना मुझे बहोत हार्ड जाता।, आज मॉर्निंग मे वाटर नही आयी। बरं ती चांगली मराठी भाषिक आहे. पण तिकडे पण तीच तर्‍हा. द्याव लागतं, करावं लागतं, असंच असतं असे शब्द वापरण्याच्या नादात, “ मी आज लवकर जातं, माझा बंटी ना असं सतत उड्या मारतं” थोडा म्हणून शांत नसतं.” अशी कर्त्याला विपरीत क्रियापदं बदलत असते. “ए जाऊ दे गं उगीच कशाला वावला चर्चा”
आता आपण वावला चर्चा नसून चर्चेला वाव देतोय असं बोलून  हे तिला बापडीला कळत नाही. परत बोलतांना सगळे इंग्रजी हेल असतात आवाजात. तिच्याशी बोलतांना घटनेचं गांभीर्य लक्षात घेण्याऐवजी शब्दांची होणारी तोडमोड व बदलणारे अर्थ ऐकून हसायला येतं.
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
तयासी मानव म्हणावे का?
या सावित्रीबाईंच्या कवितेप्रमाणे
कर्ता नाही, कर्म नाही,
क्रियापदाचा पत्ता नाही,
त्यासी भाषा म्हणावे का?
हा प्रश्नच आहे.
खरं तर वेगवेगळ्या लोकांशी जास्तीत जास्त बोलणं, विविध गावे, शहरे फिरण वेगवेगळी बोली कानावर पडणं, गप्पा, गोष्टी, विनोद, गाणी, म्हणी, वाक्रपचार या सगळ्यांचा मुलांच्या भाषिक विकासावर परिणाम होत असतो. त्याचे स्वतःच व्यक्तीमत्व बनत असतं. त्यांच्या क्षमतांचा, सुप्त गुणांचा विकास होण्यात भाषिक विकास अतिशय महत्वाचा असतो. परंतु आज बहुतांशी पालक या सगळ्या गोष्टींपासून मुलांना दूर ठेवून लवकरात लवकर मुलांना शाळा लावून मोकळे होतात. मग अभ्यास, ट्युशन, एक्स्ट्रा क्लास, इंग्रजी,फ्रेंच अशापरकिय, विदेशी भाषांच्या सहवासात मातृभाषेपासून ते लांब जातात. माझ्या परिचयातला एक पाचवीचा मुलगा आहे. त्याला प्रश्न विचारा, गोष्ट सांगा, विनोद ऐकवा, हसून बोला, रागावून बोला काहीही करा तो फक्त मान डोलवून अतिशय सामंजसपणे आपल्याकडे बघतअसतो.. मख्ख चेहर्‍याने पुस्तकात वाचल्यासारखी उत्तरे देतो. आनंद, राग, दुःख, व्देष, मत्सर कुठेच त्याच्या चेहर्‍यावर दिसत नाही. एका 10/12 वर्षाच्या मुलांचा असा समंजस शांत, गंभीर माणूस का झाला याचं उत्तर मी शोधायला जाते. तेव्हा हेच लक्षात येतं की मातृभाषेची मजा समजून न घेता इतर भाषीक गुंत्यात अडकून मेंदूची भजी झालेली ही मुलं अतिशय केविलवाणी वाटतात मला. अगदी 9/10 वर्षापासून ते चांगली 25/26 वर्षापर्यंतच्या मुलांवर असा परिणाम झालेले खुप लोक मी पाहिलेत. म्हणजेच इंग्रजी माध्यमांचा अट्टाहास, टाय, बेल्ट लावलेली परदेशातल्या सारखा युनिफॉर्म घालून रोज स्कूल बसमधून परवडत नसलेल्या दूरदूरच्या शाळेत जाणारी मुलं पालकांच्या प्रतिष्ठेचा विषय बनत गेली. तेव्हापासून एक अख्खी पिढी आपल्या मातृभाषेपासून दूर जात गेली. फक्त अभ्यास ऐके अभ्यास आणि रट्टा मार व्यवस्थेतांनी ही पिढी स्वतः आई-बाबा बनेल तेव्हा त्या बाळांचे भविष्य काय असेल...?

सारिका उबाळे परळकर
अमरावती

--

No comments:

Post a Comment