Sunday, November 11, 2018

आठवणीतल्या आठवणी

घासरगुंडी

एका संध्याकाळी रोजच्या प्रमाणे मी आणि भाऊ घरापासून जरा लांब रेल्वे स्टेशन च्या परिसरात असलेल्या बागेसारख्या पण बर्‍याच मोठ्या मोकळ्या मैदानात खेळायला गेलो..
भाऊ रोज यायचा मित्रांसोबत पण मी कधी कधी च. आम्ही राहायचो तो पण खूप मोठा वाडा होता.आलमसाहाब नावाचे ते आजोबा , त्यांचं कुटुंब आणि वाड्यातील बाकी सर्व भाडेकरु मिळून एक मोठ्ठं कुटुंब च होतं ते.
आणि वाडाही खूप मोठा.लाकूड कापायचा कारखाना च होता तो .मग बाहेर जाण्यापेक्षा तिथे पडलेल्या मोठाल्या झाडांच्या खोंडावर , लाकडाच्या ढिगार्यावर आम्ही दिवसभर खेळत असू...भाऊ आमच्या त सगळ्या त मोठा मग तो मित्रांसोबत जरा लांब खेळायला जाई....
तर मग त्या दिवशी मीही त्याच्या सोबत गेले .तिथे एक घसरगुंडी, दोन लटकायचे पोल असं काहीतरी होतं. जे मी केंव्हाही जाता येता पहायचे.. आणि त्यावर खेळायला यावं असा विचार करत तिथून आई किंवा अण्णा चा हात धरुन विचार करत करत जायचे.तर मग आज चांस आला होता.जरा  भीत भीतच मी घसरगुंडी च्या मागच्या बाजूच्या पायर्‍यांनी वर चढले एक आठ दहा पायर्‍या असतील.त्याची उंची ती किती असणार पण वर चढल्यावर मात्र मी प्रचंड घाबरले .खूप उंचीवरून खाली पाहत जाम घाबरले. खाली घसरत येण्याची हिंम्मत काही होईना.  आणि पायर्‍या पण उतराव्याशा वाटेनात .भाऊ माझ्या पेक्षा काय दोन अडीच वर्षे मोठा.तसे आम्ही दोघेही लहान च फार फार तर सहा आणि आठ वर्षांच्या आसपास असू .नक्की आठवत नाही. चढून तर बसले.उतरता येईना घसरताही येईना.चांगलीच पंचाईत झाली होती. भाऊ ही काही करु शकत नव्हता. .
मी मात्र त्याच नावाने आईच्या नावाने टाहो फोडला होता. त्यालाही काही सुचत नसावे.एखाद्या मित्राला किंवा मोठ्या माणसाला बोलवावे म्हणून तो इकडे तिकडे पाहू लागला.आणि मग थोड्या वेळाने तो ही दिसेना..मी अजूनच घाबरले .मोठमोठ्याने रडू लागले.आता माझं कसं होणार. ? आई अण्णा ला पण माहित नाही आम्ही इकडे आहोत.आता खाली उतरायचं कसं..? रात्र झाली तर..? तेवढ्यात मला माझ्याजवळ बुरख्यातले दोन हात दिसले.त्या हातात काचेच्या बांगड्या सोबत रंगीबेरंगी खड्यांचे दोन दोन कंगण पण होते.हात मला घेण्यासाठी पुढे आले आणि मी सरळ स्वतः ला झोकून दिलं.त्या बुरख्याला चेहरा नव्हता.  एक मंद वासाचं अत्तर तिच्या जवळ दरवळलं .इदच्या वेळी शिरखूरर्मा, मेंदी आणि अत्तराचा संमिश्र वास यावा तसं.....
बस्स. ....
पुढचं काही म्हणजे का...ही आठवत नाही. ते बुरख्यातले करुणेचे डोळे आणि कंगणवाले दोन हात... आठवतात फक्त. .. आजही.

आठवणीतल्या आठवणी

नागी

कधीतरी आपसूकच मन दूर..दूर ..चालत जातं.हरवलेल्या मैत्रिणी शोधत.खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दू..र निघून गेलेल्या..
बालवयातल्या.जात धर्म यांच्या पलिकडच्या....मैत्रीणी.
बालपणात शिरलं की आलम साहब आजोबांच्या वाड्यातच धावत जातं मन..त्याशिवाय पर्याय च नसतो काही.
शुभ्र कपडे पायजामा व नेहेरु शर्ट .तोंडाने काहीतरी नामस्मरण. मागे बांधलेले हात .हातातली जपमाळ .त्याचा रेशमी गोंडा.सगळ्या वाड्यातल्या लहान मुलांवर लक्ष ठेवत इकडून तिकडे फेर्‍या मारणारे अब्बा....कारखान्यात इस्ततः पसरलेल्या मोठाल्या लाकडाच्या ओंडक्यांवर आम्ही नदी की पहाड खेळत असू.कधी मोठ्या ओंडक्यांच्या मागे लपणा छपणी (हा बालपणीचा शब्द) तर कधी नुस्तंच ओंडक्यावर गप्पा मारत बसायचो. एक एक ओंडका सहा सात महिने पडून राहायचा .आणि त्या वर अक्षरशः जीव जडायचा .अचानक एखाद्या दिवशी मग तो कापण्यासाठी उचलून आरीजवळ अर्धवट अवस्थेत दिसायचा किंवा त्याचं अनेक फळ्यांमधे रुपांतर झालेलं दिसायचं..त्याची जागा सूनी सुनी वाटायची अन् उगाच गलबलून यायचं..वाड्याच्या कोपर्‍यात एका छोट्याश्या झोपडीत नागी राहायची. आरीवर लाकूड कापणार्या हानू ची मुलगी. हानू वाड्यात सगळ्यांची मेहनतीची कामे करुन द्यायचा..नेहेमी हसतमूख. एक छिद्र पडलेली बनियान आणि लुंगी .लाकूड कापत असेल तर एक रबरी एप्रन त्याच्या गळ्यात अडकवलेलं असायचं .आणि एक मोठा पॅक बंद चष्मा. .त्याला पूर्ण कपडे घातलेला कधी कोणी पाहिला च नाही.बारिक डोळे , पसरट नाक मजबूत बांधा...याउलट त्याची बायको नाजूक गोरी , कुरळ्या पिंगट केसांची , पिंगट डोळ्यांची .ती दिवसभर काम करायची .तिला मराठी बोलता येत नव्हतं. घरमालकाकडे काम करुन थोडंबहूत हिंदी यायचं.ती फेंट कलरचे नऊवारी पण खूप छोटे छोटे पातळ नेसायची.नागीशी ती गोंडी भाषेत च बोलायची.नागी....... अशी घोगर्या आवाजातली हाक ऐकली की ,'बता...ल' म्हणत नागी पळतच जायची.आईची तिला खूप काळजी वाटायची.कारण दिवसभर कामाने थकलेला हनू संध्याकाळी दारु प्यायचा आणि बायकोला खूप मारायचा.मग सकाळी ती काही कामानिमित्त वाड्यात आली की तिचा चेहरा सुजलेला, कधी डोळा काळा निळा पडलेला तर कधी तिच्या गोर्‍या चेहेऱ्यावर व्रण दिसायचे. आईसगट वाड्यतल्या इतर बायकाही हळहळायच्या. अन् ती काहीच न समजून किंवा समजूनही असेल कसंनूसं हसत राहायची. ' किती मारलं गं माय कडू भाड्यानं" या वाक्यानं मलाही हनूमामाचा राग..राग.. यायचा. संध्याकाळी स्वैपाकाच्या वेळी आई मला माझ्या छोट्या भावाला कडेवर द्यायची ."ह्या ला जरा न्ह्या गं घंटाभर कूठतरी"...हे ऐकून ऐकून तो सुध्दा" मला जरा न्ह्या ये कूटतरी घंटाभर" असं म्हणून दोन्ही हात पसरायचा वर्षा दिड वर्षाच्या छोट्या भावाला कडेवर घेऊन मग मी लाकडांवर नागीसोबत खेळायला जायचे.त्याला घेउन खेळता यायचं नाही. मग आम्ही गप्पा मारत त्याला संध्याकाळी आकाशात उडत परतणारे पोपट , कावळे, बगळे दाखवत बसायचो.वाड्याच्या मागेच मस्जिद होती .बहुधा पाच साडेपाचला अल्लाहू अकबर अल्ला... अशी आजान व्हायची .त्यावेळी मी नागी , छोटा रेणू तर कधी कधी वाड्यातली इतर मराठी लहान मुलं आब्बाच्या घरात नमाज पडणार्‍या अम्मी संजिदा, नाहेदा बाजी आणि घरातली इतर नोकर मंडळी कडे कितीतरी वेळ कुतूहलाने बघत बसायचो.त्याआधी नळावर अम्मी वजू करायची ते बघायचो...आणि वेळ कसा जायचा ते कळायचंच नाही. त्यांना ते सगळं करताना बघणं हा एक सोहळा च होता.
सरळ नाकाची , मोठ्या सुंदर डोळ्यांची गो..री अम्मी आणि त्यांच्या सुंदर पोरी कपाळापट्टी झाकून कानामागे सारलेली ओढणी अंगाभोवती गुंडाळून घ्यायच्या आणि डोळे मिटून, दोन्ही तळवे वर धरायच्या तेव्हा आम्हाला ही तस्संच करुन अल्लाकडे दुवा मागावीशी वाटायची..मग इकडे आमच्या अड्ड्यावर येऊन आम्ही ते करुन घ्यायचो.अगदी मनोभावे.नागी जवळपास माझ्या च वयाची पण खूप थोराड वाटायची.तिची आई गोरी असूनही नागी मात्र गोरी नव्हती. तिचं नाक थोराड आणि बसकं होतं .ओठ बाबरे होते.आणि केस कुरळे.ती त्या दोघांपेक्षाही खूप च वेगळी दिसायची.तिला रेणूला सांभाळायला खूप आवडायचं त्याला घेउन माझाही हात अवघडून जायचा.मी तिला त्या बदल्यात आईने खिशात दिलेले काजू, भाजके शेंगदाणे, षटकोनी खारे बिस्किट द्यायचे.नागी अजूनच खूश व्हायची.शाळेची वेळ सोडून सकाळ संध्याकाळ सुट्टी चा दिवस मी नागी फरजाना, शमीम, निर्मला लाकडांमधे हुंदडत राहायचो. लाकूड कापताना बघत तासंतास तिथे उभे राहायचो.अब्बाशी डिल करण्यासाठी बरीच लोकं येत राहायची.मग अब्बा आम्हाला 'अगे अम्मा चलो अंदर जाओ गे...'म्हणत ऑफिसात शिरायचे आणि आम्ही थेट त्यांच्या घरात .तिथे कधी बायका पान खात बसलेल्या असायच्या तर कधी तखत पोशावर बसून जेवत. मग आम्ही दुसर्‍या दरवाजातून धूम ठोकायचो. नवीन घर बांधाल्यावर त्या धावपळीत,  उत्साहात इकडे राहायला आल्यावर काही दिवसात नागी कूठे , कशी हरवली कळलं नाही. . त्यानंतर कधी कधी स्टेशन च्या रस्त्यावर अब्बा च्या वाड्यासोरुन जातांना ती भेटायची.मग आम्ही गप्पा करताना अम्मी चष्म्यातून बघत आवाज द्यायची..'कोन है गे ...?
काशिराम की बेटी की.....? सारिखा..?
अई इधर आ गे मा....कितनी बडी हो गयी गे....
मग मी अम्मीकडे नी नागी घराकडे धूम ठोकायची... आता वाड्यात अम्मी आहे ना अब्बा ना नागी....त्या लाकडाच्या ओंडक्याच्या रिकाम्या जागेसारखं सूनं सूनं सगळं.
गावी गेल्यावर कधीतरी तिकडून जातांना  तसंच गलगलबलून येतं ..अजूनही...

कूठे असेल नागी...?

आठवणीतल्या आठवणी

संतोषी माता

   "ऐ आज शुक्रवार आहे. काहीही आंबट चिंबट खायचं नाही रे पोरांनो ...,शाळेत कुणाच्या डब्याला हात नाही लावायचा.,कुणाच्याच घरचं काही खायचं नाही." आई सकाळी सकाळी च सुचना द्यायची. त्या दिवशी मग विना आंबटाचा स्वैपाक. लोंणचं नाही, लिंबू नाही ,उन्हाळा असेल तर कैरी आंबे सगळ्या वर पाणी सोडून मुकाट तोंडाला आलेलं पाणी गिळत बसावं लागे .दर शुक्रवारी हे असं चालायचं आईचं .कधी कधी आम्हा मुलांना घेऊन संतोषी मातेच्या मंदिरात जायची आई .घरापासून लांब दोनेक किलोमीटर असावं..उन गर्मी ..त्यात मंदिरात प्रचंड गर्दी असायची .बारा वा. संतोषी मातेची आरती असायची .त्या वेळी समोर एक उंची पूरी सावळी तोंडावर देवीचे व्रण असलेली लुगडेवाली बाई घामाघूम होऊन घूमत असायची..कपाळावरचं तिचं भलं मोठं लाल कुंकू घामात मिसळून ओघळत असायचं..तिने घालेलं पोपटी गर्द लुगडं, तो चेहरा आजही तस्साच आठवतो .मंदिराच्या गुळगुळीत पिवळ्या भिंती फरशी सगळं डिक्टो डोळ्यासमोर आहे अजून...
    गर्दी, घाम ,भीती चिडचिड, राग अशा संमिश्र भावना दाटून यायच्या ..आई सोबत असूनही असुरक्षित वाटून रडायला यायचं. कारण आईनेच धाक घातलेला असायचा , थोडं जरी काही चुकलं , आंबट चिंबट खाल्लं , आंबटाला हात लागला तर संतोषी माता नाक कापेल..मग काय मंदिरातून केंव्हा एकदा बाहेर पडतो असं व्हायचं. .माझा छोटा भाऊ तर नाकावर हात ठेवून च असायचा..कारण त्यानं चुकून हमखास आंबट खाल्लेलंच असायचं...गुळ फुटाण्याचा प्साद घेऊन मग बाहेर पडायचो.तोही खावा की नाही हा मोठा प्रश्न ..नाही खाल्ला तर आईला कळेल आपण आंबट खाल्लेलं ..आणि खाल्ला तर ती नाक कापेल की काय ही भीती...
मग रात्री झोपताना पण भीतीच वाटायची त्या संतोषी बयेची......
तर असा तो संतोषी मातेचा महिमा...
आम्ही सगळ्यांनी चुकून कधीतरी आंबट खाल्लेलच आहे. आईच्या माघारी ..पण आमची नाकं मात्र अजून साबूत आहेत ..चांगली तरतरीत...

Saturday, November 10, 2018

आठवणीतल्या आठवणी

चक्कीतली म्हातारी

तिने मानगुट पकडलीय माझी. गांगरुन गेलेय मी इदी एक्कूडा जागूरतुन्नदी? (ए कुठं चाल्ली?) इथ्यू पिंडी (पिठ दे) जाड जाड चष्म्याच्या भिंगातून दिसणारे तिचे भयंकर डोळे, पिठाने भरलेले केस. पिठाचाच चेहरा. पिठाचेच कपडे. पिठाने भरलेल्या हडकुळ्या हाताने तिने माझ्याजवळचा पिठाचा डबा धरलाय. सोडेचना! सोडेचना! चिडलेली ती अन् अपराधी मी. मग कसानूसा चेहरा करुन, रडकुंडीला येत... गरम गरम पिठाचा डबा मी कशी-बशी खाली घेते. डब्यातले वरवरचं थंड झालेलं पीठ मी दोन्ही हातांनी तिच्या पांढर्‍या वॉनस्टिकच्या जागोजागी कपचे उडून खरवडल्यासारखा काळा भाग दिसणार्‍या मोठ्ठ्या कटोर्‍यात टाकते. माझे दोनही हात तिच्या हातासारखेच पांढरे पांढरे होतात. पिठाळ पिठाळ. पिठाळ बोटं, माझे पिठाळ हात, तिचे पिठाळ हात, चक्कीवाल्याचे केसाळ पिठाळ हात पिठाळच हात दिसू लागतात सर्वत्र चक्कीत. मी माझा डबा उचलून पळून जायला पाहते पट्कन.

इंक्का, इंक्का (अजून) अजूक दे ना ए बिड्ड्या (ए पोरी) अजूक दे तोडं...मी घाईघाईने  वळते चक्कीचा पांढरा लाकडी उंबरा ओलांडते शिताफीनं चटकन् ...

मग बाहेर पडल्यावर माझ्यासोबत आलेल्या पण माझ्या नि म्हातारीच्या पिठासाठीच्या झटापटीत पटक्न आपला डबा घेऊन बाहेर पळून आलेल्या उज्ज्वलाला मी दुषणं देत राहाते. कशी तू उज्ज्वला? आधीच देऊन टाकायला पाहिजे होतं. आपण थोडंसं पीठ म्हातारीला नाही गं बाई... मी तर कधीच देत नाही तिला पिठ, पळूनच येते. माझी आई रागावते नं मला घरी गेल्यावर तू पण पळून यायचं होतं पटकन नं...? पण तू घाबरली- उज्ज्वला.

ए पण खरंच खूपच बदमाशय ती म्हातारी.

मला तर भितीच वाटते बा तिची. मी

हो... मी भ्यायचे तिला खूप... बटबटीत डोळ्यांची. पिठात भरलेली जुनाट म्हातारी. जाड जाड भिंगाचा धुरकट काचांचा एकच काडी असलेला गोल चष्मा तिच्या डोळ्यांवर दुसर्‍या बाजूला साडीच्या कापडाची खूप जुनाट, पिठाळ पिठाळ दोरी कानात गुंडाळल्यासारखी अडकवलेली. काळीच म्हणता येईल अशी बारीक शेड. गालावरची हाड वर आलेली, पान खाऊन लाल पिवळे झालेल्या किंचित वर असलेल्या दातांची म्हातारी दळण घेऊन तिला पिठ न देणार्‍याच्या अंगावर धाऊन जायची कातिनीसारखी आणि वाटीभर पिठ शोधून घ्यायची डब्यातलं. निसटून जाणार्‍याला चपळाईनं पकडायची उठून आणि भांडायचीच खडाखडा. तेलगूमधून शिव्या द्यायची. घाणेरड्या गरिबाला नायी देते बाडकाड ऑ...?

कदी बरं होते नायी तुजं...

तेलगू हेल काढून मराठीत शापायची त्याला.

जुना...ट, पिठा...ळ, वाळली म्हातारी.

दुपारच्या वेळी चक्कीवाला जेवायला जायचा घरी. तेंव्हा शेणाने सारवूनही पिठाने पांढुरक्या झालेल्या जमिनीवर तिच्या रोजच्या जागेवरुन जरा लांब कोपर्‍यात बसून ती ही जेवत असायची निवांत.

कधी कधी दुपारी दळणासाठी नंबर लावून ठेवण्यासाठी जायचो आम्ही. तेंव्हा ती भिंतीकडे तोंड करुन उकीडवं बसून जेवत असायची. जर्मनच्या डब्यात कसल्याश्या पातळ भाजीत भाकरीचा/पोळीचा काला करुन मांजरीप्रमाणे शांत डोळे मिटून, आपल्या लाल पिवळ्या दातांनी चघळत राहायची आरामात.

दळण ठेऊन पटकन् खेळायला जायचं असायचं आम्हाला. सगळ्या चक्कीभर तिच्या डब्यातल्या भाजीचा वास पसरलेला असायचा. आमचीही भूक खवळायची तेंव्हा. मग सरळ घरी जाऊन आईला जेवायला मागायचं... तर त्याच वासाची भाजी किंवा आमटी घरी.

कारण तिने आमच्याच घरुन नेलेलं कोरड्यास असायचं ते. जेवायच्या आधी एक जर्मनचा कडीचा डबा घेऊन ती घरी यायची. दारातूनच जरासं कोड्ड्यास दे ना बाई म्हणत तो डबा तिथेच ठेऊन बाथरुमला जाऊन यायची. आमच्या घरापुढे भले मोठे पिवळ्या रंगाचे दगडी गोदाम होते दोन. त्याच्या मागे काटेरी बाभळींची मोठाली झुडूपे होती. त्या कुचकाट्यात कुठेतरी ती बाथरुमला जाण्यासाठी आमच्या घरासमोरुन जायची. येता जाता कधी आमच्या तर कधी आमच्या शेजारच्या घरुन भाजी घेऊन जायची आणि घरुन आणलेली शिळी-पाळी भाकरी,पोळी त्यात काला करुन खात बसायची. भाकरी, पोळीची चिंता नसायची तिला. इथे मिळणार्‍या पिठावर भागायचं तिचं.

आमच्या घरापासून अगदी जवळ घरामागेच असलेली ही चक्की पुर्णपणे लाकडी फळ्यांचीच होती. चहू बाजूंनी लाकडी फळ्या आणि वर कौल. खाली सारवलेली जमिन. दळण ठेवण्यासाठीपण लाकडी फळ्यांचाच भला मोठा ओटा होता तो पूर्ण भरल्याशिवाय चक्की सुरु होत नसे. ओटा जिथून सुरु होतो तिथे चक्कीचं जातं असलेली मशिन वर मोठ्ठं पत्र्यांचं बनवलेले चौकोनी आ वासलेलं तोंड. त्यात चक्कीवाला डब्यातलं दळण रिकामं करायचा. खालून दळलेलं पीठ बाहेर येण्यासाठी भली मोठी लोखंडी तोटी होती. दळलेलं पीठ बरोबर डब्यात पडावं आणि उडू नये म्हणून त्याला एक भलं मोठं जाड कापड गोल करुन बांधलेलं. ते खरंच जाड होतं की पिठामुळे जाड झालं होतं माहित नाही. त्याचा रंगही मुळात पांढराच होता की पिठामुळे, याचंही उत्तर माहित नाही. त्याच्याखाली एक सिमेंटनी लिंपलेला खड्डा होता. लोखंडी पट्ट्यांच्या जाळीने झाकलेला- दळणाचा डबा ठेवण्यासाठी दळण टाकून खाली ठेवेपर्यंतच्या वेळात पडणारं पिठ या  सिमेंटी खड्ड्यात पडायचं. त्या जमा होणार्‍या पिठावर  या पिठाळ म्हातारीचा अधिकार असायचा. या सगळ्यामुळे तिच्या घराला थोडाफार हातभार लागत असे. गरिबीसोबत तिच्याकडे लोकांना काहीही जबरदस्तीने मागण्यांचे अधिकार होते. दिवाळी, दसरा, होळी, ईद अशा सणांच्या वेळी दुसर्‍या तिसर्‍या दिवशी वेळातला वेळ काढून ती सण मागायला येत असे. पण तिच्या मागण्यात विनंती नसायचीच कधी. तेलगू मराठी मिश्रित भाषेत खडखड करुन ती समोरच्याला दयायला भाग पाडत असे. सण मागणारीही ती एकटी नव्हती. कुठूनतरी घार्‍या घार्‍या डोळ्यांच्या सुंदर सुंदर पारधी बाया पाठीला लेकर बांधून यायच्या. कधी कधी मसणजोगी तर कधी वेषांतर करुन करमणूक करणारे. या सगळ्यांच्या आधी आपण मागून घेतलं पाहीजे यासाठी चक्कीतली म्हातारी दक्ष असे. घरी मुलगा, सून, 2/3 नातवंड त्यांच्यात कायम जीव गुतलेला तिचा. सोमवारी चक्की बंद असे. त्यातलं जातं टाकवण्याचं काम चाले. म्हातारी तेंव्हा खूप मोठ्ठ शेण घेऊन त्यावर पाणी टाकून कधी फड्याने, कधी पोतेर्‍याने तर कधी हातानेच जमिन सारवून घेई. उंबर्‍याबाहेर शेणाचा सडा टाके. हे शेण तिने एक दोन दिवस अगोदर भांडून तंडून, रस्त्यावरचं उचलून जमा केलेलं असे.

चक्कीत असलेल्या फळ्यांच्या पोकळ ओट्याखाली भला मोठा कापडी पट्टा होता. चक्की सुरु असतांना त्याचा फटाक् फटाक् असा आवाज होई. ओट्याच्या पलीकडे एका लाकडी खुर्चीवर चक्कीवाला मुन्नाभाई किंवा त्याचा मोठा भाऊ जहिरभाई आलटून पालटून बसत असत. त्याचे कपडे, डोक्यावरचे केस, मिशा, नाकातले केस, पापण्या, हातावरचे, बनियानमधून दिसणार्‍या छातीवरचे केस पिठाचे होते. चक्कीचा घर...घर...आवाज, पट्ट्याचा फट्फट् आवाज यात बोललेले सगळे आवाज दबून जात. खूप मोठ्यानं बोलावं लागे (ओरडून ओरडून) चक्कीवाला शांतपणे रांगेतले डबे रिकामे करुन दळणाचे पैसे आपल्या बनियान वजा बंडीच्या पोटावरल्या मोठ्या खिशात ठेवत असे. तो खिसा नेहेमी पैशांनी फुगलेला असे. अधून मधून कुणाची असलेली उधारी लिहून ठेवण्यासाठी त्यांच्या मांडीवर एक दुमडलेली डायरी आणि कानावर एक पेन खोचलेला असे.

उज्ज्वला नेहमी चक्कीवाल्याच्या खुर्चीला धक्का मारुन तो पडला की त्याच्या पोटातली चिल्लर घेऊन पळून जाण्याचा प्लॅन मला बोलून दाखवत असे. त्या पैशात खूप आईस्क्रेट, कुल्फ्या, नरडं येतील असं अमिष पण मला दाखवत असे. पण मी तिला तु असं कधीच करु शकणार नाहीस आणि करायला गेली तरी ही म्हातारी तुला तसं करुच देणार नाही असं तंडून तंडून पटवून देण्याचा प्रयत्न करत असे.

आणि मग मला खाली पडलेला, पिठात असलेला मुन्नाभाई, चक्कीभर सांडलेली चिल्लर, ती वेचत असतांना म्हतारीने पकडलेली उज्ज्वला दिसत राही.जाड भिंगाचा, कापडी दोर्‍यांनी बांधलेला चष्मा घातलेली, ती पिठाळ म्हातारी तिला बुकलून काढत आहे. चक्कीवाला पण उठून उज्ज्वलाचे कान पिळून तिला पोलिसात देण्याच्या धमक्या देत आहे असे दिसून मी घाबरुन उज्ज्वलाला चक्कीतच सोडून पळून जात असे.

मागील पंचवीस, तीस, पस्तीस वर्षात चक्की अजून तिथेच आहे. लाकडी फळ्यांची जागा भिंतींनी घेतलीय एवढाच काय तो बदल. कितीतरी म्हातार्‍या आल्या नि गेल्या. त्या कधीच दखलपात्रही नव्हत्या. पण माझ्यासारख्या अनेकांच्या ठराविक जिवनपटलावर त्या कायमच्या कोरल्या गेल्यात. कधी करुणा, कधी उपहास, थट्टा, चेष्टा, लाचारी तर कधी भीती बनून. पिठाळ कातिनीसारख्या.

सारीका उबाळे
अमरावती
--